Thursday, August 2, 2007

कृतार्थ

रोज रोज तेच सारे, तेच ऊन तेच वारे
तेच रोजचे पोळणे आणि रोजचे शहारे
झाड पुरते वठले, फांदी फांदी सुकी.. मुकी..
बोल फुटण्या मुळांत ओल उरे ना तितुकी
ऋतू येतात जातात, जगरहाटी चालते
क्षीण खोड कसेबसे देह आपला तोलते
कधी एखादी वेल्हाळ शीळ येते कानांवर
स्मरतात अंधुकसे गेले हिरवे बहर
अर्थशून्य भासे सारा आता फांद्यांचा पसारा
नाही पांथस्थां सावली नाही पाखरां निवारा
भार होऊन भुईला आता नको होते जिणे
काय झाडाच्या हातात रुजणे वा उन्मळणे?
आणि शेवटी एकदा तो ही दिस उजाडतो
चुलीसाठी कुणी त्याला चार लाकडे मागतो
घाव निर्दय तरीही आता वाटतात हवे
जळताना जगण्याला अर्थ लाभलेले नवे
झाड कृतार्थ हासते राख राख झाल्यावर
त्याचे गाणे आता गाते चुलीवरची भाकर..

9 comments:

Nandan said...

wa! aavaDali kavita, khas karoon shevaTachi don kaDavi.

पूनम छत्रे said...

sahi! mast. khoopach chhaan. shabdachitra aahe he.. vaachataa vaachataa dolyaasamor axarsha: ubha rahata!

Anand Sarolkar said...

Surekh!!!

HAREKRISHNAJI said...

का बरे ही अशी निराशा ?

Vidya Bhutkar said...

मी म्हटलं ना मी दरवेळी विचार करते तुझी नवीन कविता कशावर असेल आणि प्रत्येकवेळी मला ती आश्चर्यात पाडते की कुणी असं लिहू कसं शकतं म्हणून. :-) खूपच छान आहे ही कविता.
आवडली.
-विद्या.

Anonymous said...

"जळताना जगण्याला अर्थ लाभलेले नवे"...
क्या बात है! बहोत ख़ूब!!

चित्तरंजन भट said...

वा! सुंदर कविता. ओळीगणिक चांगली खुलत जाते. शेवटच्या दोन ओळींनी अतिशय उत्तम शेवट झाला आहे.

Vaidehi Bhave said...

khup chan kavita! kavitecha vishay nehemicha vatla tari mala mandayachi paddhat khup awadali..

बोल फुटण्या मुळांत ओल उरे ना तितुकी
yacha arth mala neet samajala nahi..sangshil ka?

TheKing said...

Surekh!