Saturday, March 10, 2007

भक्ताचा अभंग

त्याच्या इच्छेवीण । पान ना हालते
जग हे चालते । त्याच्यामुळे ॥
सांगती सज्जन । कोणाला जनांत
कोणाला मनात । सापडतो ॥
मलाही दिसला । बैसला रानात
कपाळाला हात । लावलेला ॥
'देऊळ सोडून । इथे कुठे देवा?
काय करू सेवा?' । विचारले ॥
म्हणे परागंदा । झालो जगातून
राहिली ना खूण । माझी कोठे ॥
दगडाधोंड्यांना । घालताती हार
भक्तीचा बाजार । मांडिलासे ॥
पालखी घालोनी । मिरविती पोथ्या
रस्त्यात आरत्या । करतात ॥
आषाढी कार्तिकी । गाठती पंढरी
चेंगराचेंगरी । नुसतीच ॥
सुख विसरले । नाही समाधान
एक अवधान । सुबत्तेचे ॥
करावी वाटते । यांची विनवणी
मस्तक ठेवोनी । पायांवर ॥
नको पूजापाठ । नको नमस्कार
नको सोपस्कार । फुकाचे ते ॥
थोडे प्रेम, थोडी । सह अनुभूती
एकमेकांसाठी । थोडा वेळ ॥
आणि थोडी चाड । असू दे सत्याची
माझ्या अस्तित्वाची । तीच खूण ॥
परदुःखे तुझा । अश्रू ओघळेल
मलाही कळेल । आहेच मी ॥
तुझ्या अंतरात । झरा जो भावाचा
त्याच रे देवाचा । मीही भक्त ॥

5 comments:

पूनम छत्रे said...

स्वाती!!!!!!!!!
दंडवत!!
फ़ार म्हणजे फ़ारच छान लिहिला आहेस..
यातही मात्रा असतात ना? (माझं ज्ञान तोकडं आहे फ़ार :( )

वैभव जोशी said...

अप्रतिम .. नेहेमीप्रमाणेच

nivant said...

Ekdum surekh!! Agadi sahajtene aatun aleli disate!

चित्तरंजन भट said...

फार सुंदर कविता.
ह्या ओळी गाळल्यातरी चालतील असे वाटते--
थोडे प्रेम, थोडी । सह अनुभूती
एकमेकांसाठी । थोडा वेळ ॥

माणिक जोशी said...

अप्रतिम गं !
ह्यानंतर कशाला काय वाचायचं असा प्रश्न पडला !