Thursday, March 15, 2007

मराठीगझल.कॉम या मुक्त व्यासपीठाचे प्रकाशन

दि १४ मार्च ०७: गझलसम्राट सुरेश भट यांच्या चतुर्थ स्मृतीदिनाच्या निमित्तानं आज मराठीगझल.कॉम (marathigazal.com) या मराठी गझलेला वाहिलेल्या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले. मराठीगझल.कॉम हे गझलकार व गझल रसिकांचे एक मुक्त व्यासपीठ असून त्याची निर्मिती प्रसाद शिरगांवकर व वैभव जोशी या दोन तरुण गझलकारांनीच केली आहे. अधिकाधिक लोकांनी मराठी गझल समजून घ्यावी आणि लिहावी... लिहिलेली गझल अधिकाधिक लोकांनी वाचावी, तिचं रसग्रहण करावं आणि या सगळ्यामधून दर्जेदार मराठी गझल निर्माण होत रहावी असा या व्यासपीठाच्या निर्मितीमागचा हेतू आहे. कोणाही गझलरसिकाला अथवा गझलकाराला या संकेतस्थळाचा सदस्य बनता येते, सदस्य बनणे अगदी सोपे आणि विनामूल्य आहे. सदस्य झालेल्यांना स्वतःच्या गझल येथे थेट प्रकाशित करता येतात. या गझलांवर इतर सदस्यांना प्रतिक्रिया, अभिप्राय आणि सूचना देऊ शकतात. या शिवाय आपल्या मनातल्या गझल विषयक प्रश्नांवर सदस्य चर्चा करू शकतात, आपल्याला असलेली माहिती इतरांना देऊ शकतात आणि एकूणातच एकमेकांच्या सहयोगानं दर्जेदार गझल निर्माण करू शकतात, अर्थातच सर्व गझल आणि चर्चा या मुक्तपणे कोणालाही (सदस्य नसले तरी) वाचता येऊ शकतात, असे या व्यासपीठाचे स्वरूप आहे. या संकेतस्थळावरील साहित्य वाचण्यासाठी अथवा येथे मराठी मधे लिहिण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा फॉन्ट डाउनलोड करावा लागत नाही.

अधिक माहिती साठी संपर्क: www.marathigazal.com, prasad.shir@gmail.com, vaibhav.joshee@gmail.com

1 comment: