Sunday, June 14, 2009

लॉर्ड ऑफ द वर्ड्स!

Spoiler Warning : लॉर्ड ऑफ द फ्लाईज वाचायचं ठरवलं असेल आणि शेवट पुस्तकातूनच वाचावा असं वाटत असेल त्यांनी स्टार्सच्या नंतरचा भाग वाचू नये.
---------------------------------------------------------------------------------

मला आठवतंय त्याप्रमाणे नववीनंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत 'पिंगळावेळ' हातांत पडलं होतं.

शब्द बसल्याजागी हसवतात, रडवतात, उत्कंठा ताणतात, थक्क करतात, जगाची सफर घडवून आणतात, कधी वैताग, कधी शिसारी आणतात, कधी गुदगुल्या करतात, तर कधी वाचताना थांबून 'कोणी बघत नाही ना' हे तपासायला भागसुद्धा पाडतात - इतपत शब्दांशी ओळख, नव्हे दोस्ती तोवर झाली होतीच. हातातलं पुस्तक मिटावं, पण डोकं त्या पानांतून बाहेर पडू नये हा ही अनुभव नवीन नव्हता.

पण हे प्रकरण निराळं आहे याची चुणूक पुस्तकाच्या नावापासूनच मिळाली. वाचायला सुरुवात केली आणि वाटलं, आपण इतके दिवस बोलत आलो तीच का ही मराठी भाषा? तेच शब्द, तीच लिपी? भयकथांमधे कशी एखादी शापित वस्तू ज्याच्या हातात पडेल त्याचं आयुष्य बदलून टाकते? तसं या पुस्तकाला हात लागल्यापासून मला माहीत असलेलं माझं जग बदलून गेलं. नव्हे, वितळून गेलं! तरी त्यांनी 'Stranger, think long before you enter..' म्हणून सावध केलं होतं...

सहसा भयकथा/thrillers वगैरे रात्री वाचल्या तर जास्त परिणाम करतात असा बर्‍याच जणांचा अनुभव असतो. मुंबईतल्या चाळीतल्या दोन खणी जागेत रात्र काही केल्या भयंकर वाटत नाही, तेव्हा मला तो अनुभव नव्हता.

माझी 'स्वामी' कथा वाचून संपली तेव्हा टळटळीत दुपार होती. कथेने तिची जादू नाही वापरली तरी आजूबाजूच्या भिंती कुठल्याही क्षणी भुरूभुरू जळून जातील असा उकाडा. इतका वेळ जिला घट्ट जमीन समजून धरून, पाय रोवून होते, तीही त्या कथेने नाहीशी करून टाकलेली! धडपडत मागल्या गॅलरीत आले. चाळीत ही वेळ विचित्र! कर्ती माणसं/बायका कामानिमित्त बाहेर, मागे उरलेली मुलंमाणसं उन्हाला दारं बंद करून घरांत कोंडलेली. गडीमाणसंसुद्धा कामं, जेवणं, तंबाखू आटोपून कुठेतरी जिन्यांखालच्या जागेत अदृष्य झालेली! कुठेतरी कांहीतरी जिवंतपणाचं लक्षण दिसावं, काही हालचाल दिसावी म्हणून प्राण कंठाशी आला! जणू कोणीतरी शाप देऊन उभी चाळ निर्मनुष्य केली होती! तेवढ्यात खालच्या बोळातून एक मोलकरीण बाहेर पडली. जाता जाता शिरस्त्यानुसार बोळाच्या भिंतीच्या कडेला पानाची पिचकारी मारून गेली. एरवी न चुकता संताप आणणारं हे दृष्य. त्या दिवशी मात्र त्याचाच प्रचंड दिलासा वाटला..

पिंगळावेळ वाचून संपलं, पण तळहातावर नवीनच रमलखूण उमटवून गेलं. मग त्या भीतीचीच चटक लागली. मग त्याहीपुढे जाऊन त्या तुटलेपणाशीच काहीतरी नाळ जुळली. तुटल्या तार्‍यासारखं जगापासून alienate झालेल्यांच्यात उठबस वाढली. 'शतदा प्रेम करावे' वगैरे म्हणणारे लोक दिसले की खदाखदा हसणारं एक संशयपिशाच्च डोक्यात कायमचं वस्तीला आलं...

आणि तरी..

तरी काल रात्रीपासून विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज्'ने हादरवून सोडलं आहे. कधी नव्हे ते मी स्वतःला 'हे पुस्तक आहे, fiction आहे, वाचून संपलं!' असं काहीतरी समजावायचा प्रयत्न करते आहे. आणि समजूत पटत नाहीये.

विमान अपघातात सापडून एका निर्जन बेटावर येऊन पडलेल्या मुलांची ही गोष्ट. त्यांच्या ओळखी, त्यांचे स्वभाव, राल्फ नावाच्या त्यांच्यातल्या थोड्या जाणत्या वयाच्या आणि त्यातल्या त्यात समजूतदार मुलाकडे त्यांचं जवळपास नैसर्गिकपणेच आलेलं म्होरकेपण, आलेल्या परिस्थितीतून परस्पर सहकार्याने मार्ग काढायचे त्यांचे ऑलमोस्ट वयाला न साजेसेही सुरुवातीचे प्रयत्न.. आणि मग..

कथेतल्या एखाद्या पात्राबरोबर identify केलं गेल्याचा अनुभव बरेचदा येतो. जवळजवळ आपल्या सुखदु:खांइतकी त्यांची सुखदु:ख जाणवतात, आपल्या प्रश्नांपेक्षाही त्यांचे प्रश्न आपले वाटायला लागतात. पण इथे ते identification त्या शब्दाच्या सगळ्या मर्यादा पार करून थेट हाडापर्यंत जाऊन भिडतं. मग आजूबाजूच्या कोलाहलात (chaos) काहीतरी सूत्र शोधू पाहणारा, सुटकेची आशा आणि त्यासाठीचे प्रयत्न जिवापाड जपू पाहणारा, त्या गोंधळाला काही नियम, काही आकार देऊ पाहणारा राल्फही आपलाच चेहरा घेऊन येतो; त्या कोलाहलापलिकडे जाऊन विचार करायची क्षमता असलेला, पण दुर्बळ असहाय्य दमेकरी पिगीही आपल्याच फुफुसांकडून श्वास उसना घेत बोलतो; काटक, आततायी, शिकारीसाठी चेहर्‍याला फासलेल्या रंगाने कोणीतरी निराळाच उन्मत्त रासवट झालेला जॅक आपल्याच ओठांच्या कडा मुडपून छद्मी हसतो; बीस्ट समजून मारला जाणारा सायमन होऊन आपणच रडतो-भेकतो-विव्हळतो; अन्नासाठी रानडुकरांची शिकार करता करता killingमधल्या थ्रिलचीच चटक लागलेले, त्या नादात आपल्याच मित्रांच्याही जिवावर उठलेले पिसाट शिकारी होऊन आपणच भाले सरसावतो आणि डोळ्यंदेखत घडलेला मनुष्यवध नाकारत आपणच आपल्यापासून नजर चुकवतो.

*****************************************************

दूर जगाच्या पाठीवर कुठेतरी आपलं घर अजूनही आहे, नकाशात आपलं गाव आहे, पण मनातून मात्र त्याच्या आठवणी, त्याची ऊब, त्याची कल्पनासुद्धा पुसट पुसट होत नाहीशी व्हायच्या बेताला आलेली आहे. पूर्वी कधीतरी आपल्या नावाला आपल्या वडिलांचं, आपल्या घराण्याचं नाव जोडलेलं होतं. 'पर्सिवल वेमस मॅडिसन. राहणार...'. आपलं अस्तित्व या सगळ्या ओळखींच्या बाह्यरेषांनी निश्चित केलं होतं. आता त्या रेषा नाहीशा झाल्यावर आपण कोण उरलो आहोत? शेवटी खरंच आपली त्या बेटावरून सुटका होते ना, तेव्हा आपल्याला तो एकेकाळी पाठ असलेला आपला पत्ता सोडा, आपलं पूर्ण नावसुद्धा आठवत नाही!!

कथा सुरू होते ती ऑलमोस्ट तक्रार करावी इतक्या संथ लयीत, पण तिच्या सगळ्या रूपकांसहित हाडामांसात रुतत, रुजत, उगवत, वाढत जाते, आणि शेवटी शेवटी त्या घटनांचा वेग सहनशक्तीच्या पलिकडे जातो. वाटतं.. त्या छापील पानांत उडी टाकावी आणि तो वेडाचार थांबवावा.. कोणीतरी ऐकेल.. कोणीतरी क्षणभर थांबून काही सारासार विचार करेल..

पण असं काहीसुद्धा करता येत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी असहाय्यपणे शेवटपर्यंत ते सगळे भोग भोगत जातो. मुळापासून अधिकाधिक हादरत जातो. ही भीती नुसती बौद्धिक पातळीवर राहत नाही. ती त्यातल्या हिंस्त्रपणाची भीती नाही. याहून भयंकर हिंसा आपण पूर्वी कधीतरी कुठेतरी पाहिली/वाचलेली आहे. ही भीती त्या हिंसेच्या विश्वसनीयतेची आहे!!

हे घडू शकतं.. हे घडतं.. नव्हे, हेच घडतं - ही जाणीव पुसताच येत नाही!!

पुस्तकभर राल्फ त्याची sanity टिकवायचा आटोकाट प्रयत्न करत असतो. तो चिडतो, चिडवतो, ओरडतो, भांडतो, मनातून घाबरतोही. मृत्यूला अक्षरशः काही इंचांच्या अंतरावरून पाहतो तेव्हा बधीरही होतो. पुस्तकभर ज्या एका घडीच्या आशेवर जगत असतो तो सुटकेचा क्षण आल्यावर मात्र इतक्या दिवसांत प्रथमच धाय मोकलून रडतो! 'Death of innocence' साठी रडतो.. माणसाच्या काळजात केवढा भयाण काळोख दाटलेला आहे ते उमजून रडतो..

तो रडतो.. आणि आपण फक्त भान विसरून पाहत राहतो..

4 comments:

Pooja said...

Sahaj unkonwn blog vacht ya blog paryanta phochale...it ws beautiful journey through your this blog....
Jst halvun sodala...great work!

वैभव जोशी said...

mast !!!

Parag Vasekar said...

'lord of the flies' maze all-time favorite, tasech 'pingalvel' hi. Mazya junya athavanina ujaLa dilyabaddal dhanyawad. Nirjan betawarhi human instinct kasa evolve hoto aani tehi lahan mulant, yaache khupach chittathararak varnan Goldingne kele aahe.

विशाखा said...

Mastttt lihila ahe!
भयकथांमधे कशी एखादी शापित वस्तू ज्याच्या हातात पडेल त्याचं आयुष्य बदलून टाकते? तसं या पुस्तकाला हात लागल्यापासून मला माहीत असलेलं माझं जग बदलून गेलं. नव्हे, वितळून गेलं!
Hya vakya ne ch jinklay!