रोज पाहते अवती भवती स्नेहाविण सुकलेली नाती
तेज कालचे ओसरलेल्या, काजळलेल्या उदास वाती
संवादांचीही चाकोरी.. तेच उसासे.. तोच उमाळा..
परस्परांची सवयच नुसती.. तिलाच म्हणती लळा जिव्हाळा
रोज टाळणे जबाबदा-या, रोज भांडणे हक्कासाठी
हार गळ्यातिल कुण्या काळचे जोखड झाले मानेभवती
हीच काय पूर्तता प्रीतिची? लोकमान्यता? विवाहबंधन?
गोंडस नावांखाली नुसते देहाचे सुख, पुनरुत्पादन
म्हणून सखया या सा-याहुन नाते सुंदर तुझे नि माझे
शिळेपणाचा शाप न याला.. बकुलफुलापरी सदैव ताजे
असो अनामिक सौह्रद अपुले, नसो तया उपमान जगी
विशुद्ध निर्मळ सदैव उत्कट केवळ ह्रदयाची सलगी
मोजमाप ना देवघेविचे, दुःख न जवळी नसण्याचे
आश्वासन मज असे पुरेसे केवळ त्याच्या असण्याचे..
16 comments:
सुरेख!
आहाहा...................
केवळ सु रे ख...
माझ्या जवळ असले नसलेले सगळे शब्द कुर्बान या कवितेवर
:)
wah!
doosara kaDava mastach..
ek shankaa.. 'upamaan' mhaNaje?
धन्यवाद, सर्वांचेच.
पूनम, 'उपमान' म्हणजे ज्याची उपमा दिली जाते ते, आणि 'उपमेय' म्हणजे ज्याला ती दिली जाते ते. थोडक्यात या नात्याला दुसरी कसली उपमा देता येत नाही, याच्यासारखं हेच.
आहाहा! स्वाती काय सुरेख शब्दात पकडायला जमलं ग तुला सगळं..
swati... kay bolu!!!
ek wegalach anubhav shabdaat maa.nDalaa aahes...
हीच काय पूर्तता प्रीतिची? लोकमान्यता? विवाहबंधन?
गोंडस नावांखाली नुसते देहाचे सुख, पुनरुत्पादन
wah!
Masterpiece आहे हा ! खरंच !
अप्रतिम स्वाती !
अप्रतिम .
(रोज "पाहते" लिहीलं तरी चालेल ना? मीटर हॅम्पर होत नाहीये आणि योग्य शब्दही वापरला जाईल. )
प्रतिक्रियांसाठी सर्वांची आभारी आहे.
वैभव, बदल केलाय. धन्यवाद. :)
स्वाती..... अतिशय सुरेख! खूप आवडली.
झकास!
आपल्या कविता सुरेखच आहेत!पण एक शंका विचारू का?हे घायाळ मनाचे आक्रंदन वाटतेय!खरे आहे का?(बहुतेक कवितांमधील सूर तसा वाटतोय!)
तसदीबद्दल क्षमस्व!
chhan ahe
Aga he tar mast shakspearian sonnet watatay...
Post a Comment