Wednesday, February 23, 2011

दया

पुन्हा सांज झाली, तुझ्या आठवांनी कडाडून चावा पुन्हा घेतला
पुन्हा रात्र काळीनिळी झोंबणारी पुन्हा तोच जल्लोष रक्तातला

पुन्हा पावलांतून काटा निघावा तसे मार्ग कक्षेतले लोपले
पुन्हा बेहिशोबी दिशेला नव्याने तुला शोधण्या स्वप्न झेपावले

पुन्हा पिंजले अंतराळातले खोल गंधार, धुंडाळल्या चाहुली
नशा जीवघेणी निराशेतली अंतरा अंतराने पुन्हा चाखली

अकस्मात फुटले नभी तांबडे.. चेतलेल्या उन्हाने फणा काढला
पुन्हा पेटले अद्‌भुताचे किनारे.. धगीने पिसारा पुन्हा जाळला!

पुन्हा तीच माती.. पुन्हा त्याच वाटा.. पुन्हा त्याच पायांतल्या साखळ्या..
पुन्हा ती उदासीन शरणागती आणि साक्षीस निर्ढावल्या सावल्या!

पुन्हा लादला सूर्य पाठीवरी अन्‌ पुन्हा निग्रहाने दिवस लोटला
दया येउनी शेवटी आठवांनी कडाडून चावा पुन्हा घेतला....!!