Friday, April 13, 2007

विरह

काय सख्या दशा माझी, कशी घातलीस भूल
कुठे धावे मन माझे, कुठे पडते पाऊल!

पुसे मजला अंगण.. नाही सडा सारवण
आणि कितीक दिसांत नाही लिंपलेली चूल

पाणोठ्यावरुनी येता मला हासतो कदंब
घागर रिकामी माझी, नयनांत भरे जल

नाही साज ना शृंगार, नाही साधी वेणीफणी
विस्कटे सिंदूर आणि मोकळेच हे कुंतल

अपरात्री वारा घाली शीळ वेळूच्या बनात
रात्रभर जागते मी शोधीत तुझी चाहूल

शून्य सारे तुजवीण तबकात पंचप्राण
रिता मनाचा गाभारा.. रिते देहाचे देऊळ..

9 comments:

  1. फारच सुंदर. कविता खूपच आवडली.तुझ्या सर्वच कविता मला आवडतात.
    -विद्या.

    ReplyDelete
  2. अप्रतिम (विशेषत: शेवटच्या कडव्यातील " तबकातील पंचप्राण" )

    ReplyDelete
  3. Aj prathamach tumcha blog vachla...Khupach chhan lihita tumhi...agdi manala bhidel asa!

    Keep up the good work!

    ReplyDelete
  4. अप्रतिम !
    शेवटच्या दोन ओळी कहर आहेत.. कहर !

    ReplyDelete
  5. सुरेख व्यक्त झालाय विरह..

    ReplyDelete