Monday, February 19, 2007

चाकोरी

सुबक ठेंगणे घर माझे, पण
चाकोरीची गळ्यात दावण
क्षूद्र आतले टिचभर वैभव
ते राखाया भवती कुंपण

कवाडातुनी वितभर माझ्या
परंतु दिसतो अथांग सागर
करुनी गर्जना कथितो मजला,
'विसर अता ती फुटकी घागर!'

पौरुषास ललकारत उठती
वादळवारे, काजळलाटा
'ऊब सोडुनी खुराड्यातली
शोध', सांगती, 'नवीन वाटा!'

'विचार कसला करिसी? त्या बघ
गगनी नक्षत्रांच्या राशी
पाण्यावर चमचमते सोने,
अगणित रत्ने अमुच्यापाशी'

जाईन म्हणतो एक दिवस मी
त्यांच्या हाकेसरशी धावुन
अजून थोडी जमवुन पुंजी
जरा बरासा मुहूर्त पाहुन

तोवर आहे ठीकच येथे
भिंती, छप्पर, परसू, अंगण
चाकोरी काचली गळा जर
घालिन दो पैशाचे वंगण!!

15 comments:

  1. चाकोरी काचली गळा जर
    घालिन दो पैशाचे वंगण!!
    vaa!

    ReplyDelete
  2. कवाडातुनी वितभर माझ्या
    परंतु दिसतो अथांग सागर
    ....
    चाकोरी काचली गळा जर
    घालिन दो पैशाचे वंगण!!
    ....

    वावा!! कविता आवडली.

    ReplyDelete
  3. waah! surekh!
    faar chhaan kavitaa swati! mast!
    shevaT ultimate ahe!

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. एकदम आवडेश! तुझ्या सगळ्याच कविता खूप आवडल्या.

    ReplyDelete
  6. वा ! फारच छान.

    चाकोरी काचली गळा जर
    घालिन दो पैशाचे वंगण!!

    खूप आवडली कविता.

    -विद्या.

    ReplyDelete
  7. वा! मस्तच ! "चाकोरी" खूप आवडली.

    ReplyDelete
  8. सहजसुंदर!!!

    प्रमोद देव.

    ReplyDelete