Tuesday, January 9, 2007

तिढा

तसे मांडतानाच ठाऊक होते,
घडी दो घडींचाच हा डाव आहे
कुठे काळ सांगून सवरून येतो?
क्षणार्धात सोडायचा गाव आहे

इथे भेटणारे प्रवासीच सारे,
कशाला वृथा सोबतीचे दिलासे?
जिथे मार्ग नियतीच ती एक जाणे
तिथे काय मागाल कसले खुलासे?

जरी ज्ञात सारे, तरीही कळेना
कसा गुंतला जीव प्रत्येक ठायी
कसे घातले हे तिढे बंधनांचे
स्वहस्ते असे मीच माझ्याच पायी

सवालास या टाळणे काय सोपे?
म्हणावे, नशीबात होतेच हे ही
सुखासीन आयुष्य नव्हतेच केव्हा,
सुखेनैव अन प्राण जाणार नाही....

5 comments:

  1. vah swati sundara kevala sundara tucha eka lihu janesa he

    ReplyDelete
  2. वाह...
    खरच
    इथे भेटणारे प्रवासीच सारे,
    कशाला वृथा सोबतीचे दिलासे?
    जिथे मार्ग नियतीच ती एक जाणे
    तिथे काय मागाल कसले खुलासे?>>

    क्या बात है....

    ReplyDelete
  3. सुखेनैव अन प्राण जाणार नाही..
    छान!

    ReplyDelete
  4. मस्तच जमलाय गं तिढा.......!

    ReplyDelete